Monday, June 25, 2007

"सांज गारवा" - Sanz Garava Poems

संध्याकाळ जवळ आली की............

संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं
तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं
माणसांमध्ये असुनसुध्दा मी अगदी एकटा असतो
अळवावरचा थेंब जसा त्यावर बसुन वेगळा असतो
मला व्याकूळलेला पाहून सुर्य क्षणभर रेगांळतो
इंद्रधनु होतो आणि सात रंगात ओघळतो
आभाळ झुकतं पश्चिमेला आणि थोडी कुदं हवा
वा-यावरती लहरत येतो तुझ्या आठवणींचा थवा
एकाएकी दरवळ उठतो रातराणी येते फुलुन
तु आता येते आहेस याची मला पटते खुण
पैजंणांची छमछम आणि कानामागे तुझे श्वास
चोहिकडे भरुन राहतात घमघमणारे तुझे भास
खरंच,संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं
तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं.......!

"गारवा" - Garava Poems

गारवा....

Vedio:



Lyrics:

गारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये नभात ही चांदवा नवा नवा

गवतात गाणे झूलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये मनात ही ताजवा नवा नवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा

********************************************************

त्याला पाऊस आवडत नाही.....

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.

**********************************************************

झाडाखाली बसलेले.....

झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा,
आठवूनी मेघ जुना
कोणी भिजलेले

वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू,
होऊनिया थेंब जणू,
आता टपटपले

पाऊस हा असा,
झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा,
डोळयात थेंब खुणा
होऊनिया धुंद खरे,
आज पुन्हा गार झरे
येथे झरझरले

काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी,
सावरुनी आज कुणी,
येथे थरथरले

*************************************************************

पाणी झरत चालल...

पाणी झरत चालले
आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने
वर ढगात गाठले

पाणी झरत चालले
झाड झाडाच्या मीठीत
आता झाडाच्या भवती
रान आगीच्या ढगीत

पाणी झरत चालले
नदी सागर भरती
वाळू ओलावली सारी
दोन्ही किनारयावरती

पाणी झरत चालले
उभ्या रानाला तहान
पाणी झरत चालले
उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं

पाणी झरत चालले
आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले

*************************************************************

पुन्हा ढग दाटून येतात....

पुन्हा ढग दाटून येतात,
पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारेच पावसाळे,
माझ्या मनात भिजून जातात

पुन्हा पाऊस ओला ओला,
पुन्हा पाऊस बांधून झूला
तिच्याकडले उरले झोके,
परत करतो माझे मला

पुन्हा पाऊस खूप ऐकतो,
पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पांमधले
तिचे थेंब अलगद झेलतो

पुन्हा पावसाला सांगतो मी,
पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब,
पुन्हा पावसालाच मागतो मी

**********************************************************

रिमझिम धून....

रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण?

मन फुलांचा थवा,
गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा,
जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला,
आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला,
उगाच मनात बावरुन

वार्‍यात गाणे कुणाचे,
गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता,
सुरात तुला मी कवळून ...

रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण?

***************************************************************

पुन्हा पावसालाच सांगायचे....

पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे

मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे

घराने मला आज समजावले
भिजूनी घरी रोज परतायचे

तुझी आसवे पाझरु लागता
खर्‍या पावसाने कुठे जायचे

********************************************************

मन गारठता ....गारवा...

पाऊस पडून गेल्यावर,
मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती
पाण्यावर रांगत गेले

थेंबांना सावरलेल्या
त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर,
मी भिजलेल्या झाडांचा

पाऊस पडून गेल्यावर,
मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या
त्या डबक्यांतील पोरांचे

मोडून मनाची दारे,
येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर,
या ओल्या रस्त्यावरती

पाऊस पडून गेल्यावर,
मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्‍या,
विझलेला शांत निजलेला

पाऊस पडून गेल्यावर,
मन भिरभीरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर,
मन गारठता गारवा ....

*********************************************************

बघ माझी आठवण येते का....

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ,
बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

********************************************************************

पाऊस दाटलेला....
पाऊस दाटलेला,
माझ्या घरावरी हा
दारास भास आता,
हळूवार पावलांचा

गवतास थेंब सारे
बिलगून बैसलेले
निथळून साचलेले,
तळवा भिजेल आता,
हळूवार पावलांचा

झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले,
पंखात नाद त्यांच्या
हळूवार पावलांचा

पाऊल वाट सारी,
रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली,
ओला ठसा कुणाच्या
हळूवार पावलांचा

*********************************************************

Thursday, June 21, 2007

Radha hi Bavari ( radha hi bawari )





Lyrics:


रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते


ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते


त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -


राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !


हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना


चिंब चिंब देहवरुनी श्रावणधारा झरताना


हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई


हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई


त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -


राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !


आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती


तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती


हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई


हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही


त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई - राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !


गीत - अशोक पत्की


संगीत - अशोक पत्की


स्वर - स्वप्निल बांदोडकर


अल्बम - तू माझा किनारा (२००४)

Mi Marathi